mumbai – महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले देशाचे नवे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा बार कौन्सील ऑफ महाराष्ट्र आणि गोवा तर्फे येत्या रविवारी (१८ मे) भव्य सत्कार करण्यात येणार आहे.
भारताच्या ५२ व्या सरन्यायाधीश पदी विराजमान होऊन न्यायमूर्ती भूषण गवई यांनी १४ मे २०२५ रोजी, शपथ घेतली. यानिमित्ताने बार कौन्सील ऑफ महाराष्ट्र आणि गोवा तर्फे एक दिवसीय राज्य स्तरीय वकील परिषद आयोजित करण्यात आली आहे. सदर परिषदेच्या वेळी सरन्यायाधीश भूषण गवई यांचा भव्य सत्कार होणार आहे.
हा कार्यक्रम योगी सभागृह, स्वामी नारायण मंदिर, दादर स्थानक जवळ दादर पूर्व, मुंबई येथे सकाळी ११ वाजल्यापासून सुरु होणार आहे. कार्यक्रमास सर्वोच्च न्यायालय येथील तसेच मुंबई उच्च न्यायालय येथील विविध न्यायमूर्ती तसेच बार कौन्सील ऑफ इंडिया चे अध्यक्ष, सदस्य व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, या कार्यक्रमास वकील बंधू भगिनींनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन ऍड. विठ्ठल कोंडे – देशमुख (अध्यक्ष) बार कौन्सील ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी केले आहे.