mumbai – क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना देशाचा सर्वोच्च ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान करुन गौरवण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करणारा ठराव महाराष्ट्र विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला आहे. हा ठराव पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेत मांडला.
क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी उपेक्षित, वंचितांच्या जीवनात समृद्धीचा प्रकाश निर्माण करत, सामाजिक न्यायासाठी आयुष्य खर्ची घालून, अस्पृश्यता निवारण आणि स्त्री शिक्षणासाठी संघर्ष केला आहे. त्यामुळे क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना “भारतरत्न” या सर्वोच्च पुरस्काराने मरणोत्तर सन्मानित करण्याच्या प्रयोजनार्थ हा ठराव मांडला आहे.
मंत्री रावल म्हणाले, भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असून राजकारण, कला, साहित्य आणि विज्ञान क्षेत्रातील विचारवंत, शास्त्रज्ञ, उद्योगपती, लेखक आणि समाजसेवक यांना या पुरस्काराने गौरवण्यात येते. क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना “भारतरत्न” या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्याची शिफारस केंद्र शासनाकडे करण्यात येणार असल्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सभागृहात सांगितले.
भारतरत्न पुरस्कार देण्याबाबत मांडलेल्या या ठरावाला छगन भुजबळ यांनी पाठिंबा दर्शवला. दरम्यान, हा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला.