गेले नऊ महिने अंतराळ स्थानकात अडकून पडलेल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर आज पहाटे ३.२७ वाजता यशस्वीरीत्या पृथ्वीवर परतले.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातील नासाचे निक हेग आणि रशियन अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव्ह हेही पृथ्वीवर परतले आहेत. या अंतराळवीरांना घेऊन येणारं स्पेसएक्सचं कॅपसूल फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर यशस्वीपणे उतरलं असल्याची माहिती अमेरिकन अंतराळ संस्था, नासानं दिली आहे.

सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर यांना घेऊन नासा आणि स्पेस एक्सचं कॅप्सुल भारतीय वेळेनुसार आज बुधवारी पहाटे तीन वाजून २७ मिनिटांनी पृथ्वीवर दाखल झाले आहेत. ड्रॅगन स्पेसक्राफ्ट कॅप्सूलने फ्लोरिडाच्या किनारपट्टीवरील समुद्रात एक स्प्लॅशडाउन केले. यानंतर, यानातील सर्वांना बाहेर काढण्यात आले. नासाकडून याचे थेट लाईव्ह प्रेक्षपण देखील करण्यात आले.
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोन अंतराळवीर ५ जून २०२४ रोजी स्टारलायनरमधून आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनकडे झेपावले होते. तिथे ८ दिवस घालवल्यानंतर ते परतणार होते. मात्र त्यांच्या अंतराळयानामध्ये बिघाड झाला. त्यामुळे ते दोघेही तिथेच अडकून पडले होते. अनेक अडचणींचा सामना केल्यानंतर आज पहाटे सर्व अंतराळवीर पृथ्वीवर सुखरुपपणे परतले आहेत.