latur – दुचाकीला वाचविण्याच्या नादात एसटी बस उलटल्याची घटना लातूर जिल्ह्यात घडली आहे. लातूर-नांदेड महामार्गावर चाकुर तालुक्यातील नांदगाव पाटीजवळ हा भीषण अपघात घडला असून, या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. तर काही जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लातूरहून ही एसटी अहमदपूरला जात होती. नांदेड महामार्गावर नांदगाव पाटीजवळ एसटी पोहोचली असताना त्याचवेळी या महामार्गावर एक दुचाकीस्वार रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होता. पाठीमागे न पाहता या दुचाकीस्वाराने आपली बाईक रस्ता ओलांडण्यासाठी वळवली. त्याचवेळी समोरून येणाऱ्या एसटी चालकाने दुचाकीस्वाराला पाहिलं आणि बस वळवली.
दुचाकीस्वारानेही आपली दुचाकी विरुद्ध दिशेला वळवली. पण बसचालकाने बस ही विरुद्ध दिशेनं येणाऱ्या महामार्गावर नेली. त्यावेळी बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे एसटी बस जोरात उलटली. आणि या अपघातात प्रवासी जखमी झाले. अपघात पाहताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बसमधील जखमी प्रवाशांना बाहेर काढलं आणि रुग्णालयात दाखल केलं.