kalyan – कल्याण डोंबिवली महापालिकेतील एका लिपिकाला दीड लाख रूपयांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. प्रकाश धिवर असे या लिपिकाचे नाव असून, मुख्यालयातील बाजार परवाना विभागात हा लिपिक कार्यरत आहे. व्यवसायाचा परवाना अर्ज स्वीकृत करण्यासाठी आणि परवाना हस्तांतरित करण्यासाठी धिवर यांनी २ लाख रूपये लाचेची मागणी केली असल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे पालिका हद्दीत मटण विक्रीचा व्यवसाय करतात या व्यवसायाचा परवाना अर्ज स्वीकृत करण्यासाठी आणि परवाना हस्तांतरित करण्यासाठी मदत म्हणून बाजार व परवाना विभागातील लिपिक प्रकाश धिवर यांनी तक्रारदार यांच्याकडे स्वत:साठी आणि वरिष्ठांसाठी २ लाख रूपये लाचेची मागणी केली होती. एवढी रक्कम देणे तक्रारदारास शक्य नसल्यामुळे तडजोडी अंती ही रक्कम १ लाख ५० हजार स्वीकारण्याचे धिवर यांनी मान्य केले.
याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. पडताळणी कारवाईत धिवर हे लाच मागत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर एसीबीने सापळा रचून तक्रारदाराकडून दीड लाख रूपये घेताना प्रकाश धिवर यांना रंगेहाथ पकडले.