pune – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणार्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार इयत्ता बारावीची परीक्षा दि. ११ फेब्रुवारी २०२५ ते १८ मार्च २०२५ या दरम्यान तर दहावीची परीक्षा दि. २१ फेब्रुवारी २०२५ ते १७ मार्च २०२५ या कालावधीत हाेणार आहेत अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपुर,छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोलहापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
त्यानुसार इयत्ता बारावीची सर्वसाधारण, व्दिलक्षी व व्यवसाय अभ्यासक्रम तसेच माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान विषयांची ऑनलाईन परीक्षा दि. ११ फेब्रुवारी २०२५ राेजी सुरू हाेणार आहे तर शेवटचा पेपर १८ मार्च २०२५ राेजी हाेणार आहे. यासह प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच एनएसक्यूएफ अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा दि. २४ जानेवारी २०२५ ते १० फेब्रुवारी २०२५ या कालावधीत हाेणार आहे.
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १०वी ) परीक्षा शुकवार, दि. २१ फेब्रुवारी २०२५ सुरू हाेणार असून दि. १७ मार्च २०२५ राेजी संपणार आहे. त्यानंतर प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा दि.३ फेब्रुवारी २०२५ ते २० फेब्रुवारी २०२५ या कालावधीत हाेणार आहेत.