मुंबई – भारतीय रिझर्व्ह बँकेने दहाव्यांदा रेपो रेट जाहीर केला असून, या रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेने सलग दहाव्यांदा रेपो दर ६.५ टक्के ठेवला आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) द्विमासिक पतधोरण आढावा बैठकीत रेपो दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता सलग दहाव्या वेळी रेपो दर ६.५ टक्क्यांवर स्थिर राहणार आहे.
पतधोरण जाहीर करताना आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले की, समितीच्या सहापैकी पाच सदस्यांनी रेपो दर कायम ठेवण्याच्या बाजूने मत दिले. रिझर्व्ह बँकेने मागील नऊ क्रेडिट पॉलिसींमध्ये म्हणजे फेब्रुवारी २०२३ पासून रेपो दरात कोणतेही बदल केलेले नाहीत म्हणजे आरबीआयने पत धोरणातील दर ६.५ टक्क्यांवर जैसे थे ठेवले आहेत. आरबीआयच्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीची बैठक ७ ऑक्टोबरपासून सुरू झाली. त्यानंतर उपरोक्त स्थिती जाहीर करण्यात आली आहे.