कोल्हापूर – दारूच्या नशेत मुलीला वारंवार त्रास देणाऱ्या जावयाची सासू-सासऱ्याने धावत्या एसटी बसमध्ये गळा आवळून हत्या केली असल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडली आहे. याप्रकरणी जावयाची हत्या करणाऱ्या सासू-सासर्याला पोलिसांनी अटक केली आहे. संदीप शिरगावे असं हत्या झालेल्या जावयाचे नाव आहे. तर हनुमंत अप्पा काळे आणि गौरवा काळे (सासू – सासरे) अशी या दोघांची नावे आहेत. गडहिंग्लज ते कोल्हापूर एसटी प्रवासात संदीपचा खून करून मृतदेह बसस्थानकावर टाकून या दोघांनी पळ काढला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, सी.बी.एस. स्टँड परिसरात एक अज्ञात व्यक्ती बेवारस स्थितीत मृत अवस्थेत पडलेला असल्याची माहिती एसटी कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिली. ही माहिती मिळताच शाहूपुरी पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अधिकारी आणि अमंलदार यांनी तात्काळ सी.बी.एस. स्टँड येथे घटनास्थळी पाहणी केली. यावेळी बेवारस स्थितीत असलेल्या व्यक्तीचा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने गळा आवळून ठार मारल्याची प्राथमिक माहिती समोर आली. मृत व्यक्तीची तपासणी केली असता त्याच्याजवळील कागदपत्रावरुन त्याचे नाव संदिप रामगोंडा असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे सासू गौरा हनमंतआप्पा काळे आणि सासरा हनमंत आप्पा यल्लाप्पा काळे यांना अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत जावई दारूच्या नशेत मुलीला वारंवार त्रास देत असल्याची माहिती समोर आली.