मुंबई – अब्रुनुकसानीच्या खटल्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना माझगाव सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. या प्रकरणी न्यायालयाने संजय राऊत यांना २५ हजारांचा दंड आणि १५ दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी केलेल्या मानहानीच्या आरोपांप्रकरणी आज सुनावणी पार पडली. त्यावेळी न्यायमूर्तींनी राऊतांना शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने संजय राऊत यांना २५ हजार रुपये दंड ठोठावताना ही रक्कम मेधा यांना नुकसान म्हणून देण्याचेही आदेश दिले आहेत. तसेच त्यांना १५ दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
काय प्रकरण आहे?
संजय राऊत यांनी मेधा सोमय्या या मीरा भाईंदर येथील एका शौचालय घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केला होता. याविरोधात मेधा सोमय्या यांनी माझगाव सत्र न्यायालयात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. याप्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊन न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. या निकालाची आज सुनावणी झाली. तेव्हा न्यायालयाने संजय राऊत यांना दोषी ठरवत २५ हजारांचा दंड आणि १५ दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
दरम्यान, संजय राऊत यांच्याकडून अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करण्यात आला. आता या प्रकरणात संजय राऊतांना दिलासा मिळाला आहे. संजय राऊतांचा अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. १५ हजारांच्या जातमुचलक्यावर संजय राऊतांना जामीन मंजूर झाला आहे. ३० दिवसांच्या आत वरच्या कोर्टात अपिल करून दाद मागण्याची मुभाही कोर्टाकडून देण्यात आली आहे.