नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रिमंडळाने वन नेशन, वन इलेक्शन प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. ज्यामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याचा प्रस्ताव असून, शहरी संस्था आणि पंचायत निवडणुका १०० दिवसांच्या आत घ्याव्यात, असे प्रस्तावित आहे.
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखालील समितीच्या अहवालात या शिफारशी करण्यात आल्या आहेत. याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ या उच्चस्तरीय समितीच्या शिफारशी स्वीकारल्या आहेत. मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला एकमताने मंजुरी दिली.
पुढे वैष्णव म्हणाले की, या प्रस्तावाची अंमलबजावणी दोन टप्प्यात केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि दुसऱ्या टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (ग्रामपंचायत, गट, जिल्हा पंचायत) आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था (नगरपालिका आणि नगरपालिका समित्या किंवा महानगरपालिका) निवडणुका होतील.
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या समितीच्या शिफारशींवर भारतभर विविध मंचांवर चर्चा केली जाईल.एकाचवेळी निवडणुकांबाबत कोविंद पॅनेलच्या शिफारशी पुढे नेण्यासाठी अंमलबजावणी गट तयार केला जाईल, असेही ते म्हणाले.