मुंबई – राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यासाठी आज मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. अनेक जिल्ह्यातून पहाटेपासूनच या संपाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे एसटी बसेस सकाळपासून डेपोमध्येच उभ्या असल्याचे दिसत असून, बसस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सोलापूर विभागातील वाहतूक सेवा सुरळीत सुरू आहेत. तर, ठाणे, कल्याण, विठ्ठलवाडी डेपो पूर्णपणे बंद आहेत. लातूर आणि नांदेड विभागातील बहुतांश डेपो बंद आहेत. अकोला, अमरावती आणि अहमदनगर आणि धाराशिव जिल्ह्यातील एसटी बसेस या डेपोमध्ये उभ्या आहेत.
राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी महामंडळातील कामगारांना वेतन द्यावे, या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचारी संघटनेकडून सेवा बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासोबतच आर्थिक बाबी, खासगीकरण अशा विविध मागण्या विधानसभेची आचारसंहिता लागण्याआधी मान्य करा, असा इशाराही एसटी कर्मचारी संघटनेने दिला आहे. एसटी कामगाराने संयुक्त कृती समितीच्या वतीने प्रलंबित मागणी मान्य न झाल्याने हे आंदोलन केले जात आहे.