महाराष्ट्र – मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे विस्कळीत झाली आहे. कोकण रेल्वे मार्गावरील गोवा राज्यातील मालपे (पेडणे-गोवा) टनेल मध्ये पाणी व चिखल भरल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वे गाड्या ठिकठिकाणी थांबविण्यात आल्या असून, यातून मार्ग काढण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
बोगद्यात पाणी शिरल्यानं कोकण रेल्वे मार्गावरच्या अनेक गाड्या आज रद्द करण्यात आल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून मडगावला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस तसंच, मंगळुरू एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मडगावहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मांडवी एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस आणि सावंतवाडी-दिवा एक्सप्रेस या गाड्याही आज रद्द झाल्या आहेत.
काल सुटलेली हजरत निजामुद्दीन-एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेस पनवेल-लोणावळा-पुणे-मिरज-मडगाव या मार्गे वळवण्यात आली आहे, अशी माहिती कोकण रेल्वेने दिली आहे.