नवी दिल्ली – NEET आणि UGC-NET परीक्षेतील पेपर लीकमुळे संपूर्ण देशभरात गदारोळ निर्माण झाल्यानंतर विविध स्पर्धा परीक्षांमधल्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं कठोर कायदा केला आहे. दोषींना 10 वर्षे पर्यंत तुरुंगवास आणि 1 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. या तरतुदी लागू होत असल्याचं राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. 21 जून 2024 (शुक्रवारपासून) केंद्र सरकारने सार्वजनिक परीक्षा कायद्याच्या तरतुदी लागू केल्या आहेत.
केंद्रीय लोकसेवा आयोग, कर्मचारी निवड आयोग, नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA, रेल्वे भरती आणि बँकिंग भरती परीक्षा अशा विविध सार्वजनिक परीक्षांमध्ये होणार्या अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी या तरतुदी लागू असतील. दरम्यान, संसदेने सार्वजनिक परीक्षा कायदा 2024 हा फेब्रुवारी महिन्यात मंजूर केला होता.