भाजपचे अद्वय हिरे यांचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश…

Published:

मुंबई – नाशिक जिल्ह्यातील भाजपचे नेते अद्वय हिरे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी अद्वय हिरे यांच्या हाती शिवबंधन बांधले. त्यावेळी खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, खासदार विनायक राऊत उपस्थित होते. शिवसेनेत प्रवेश करताच अद्वय हिरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

२००९ साली स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी लोकसभेची जागा निवडून देण्याची विनंती केली. तेव्हापासून मी भाजपाबरोबर काम करत आहे. भाजपामध्ये गेल्यावर सर्वजण पक्ष सोडून गेले होते. देशात सोनिया गांधींना पंतप्रधान करण्याची लाट होती. अशा परिस्थितीत मंत्र्याला लोकसभेत पाडून भाजपाचा उमेदवार निवडून आणला. सरपंच, जिल्हा परिषदमध्ये भाजपाची सत्ता आणली. पण, आता ५० गद्दार भाजपाच्या मांडीवर बसल्यापासून त्यांना आमची गरज राहिली नाही. कोणत्याही व्यक्तीगत पदासाठी भाजपाकडे मागणी केली नाही. शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली, तेव्हा आंदोलन केले पण, पक्षाने शेतकऱ्याला मरू दिले. त्यामुळे भाजपाचा त्याग केला असे हिरे म्हणाले.

कालपासून भाजपाला माझी अचानक आठवण आली. प्रदेशाध्यक्षांपासून सर्वांचे फोन आले. त्यांना स्पष्टपणे म्हटलं की कितीही खोके, कितीही सत्ता दिली तरी उद्धव ठाकरेंना दिलेला शब्द मोडणार नाही. पैसा आणि सत्तेसाठी बाप बदलणारी अवलाद माझी नाही. उत्तर महाराष्ट्रात शिवसेना पक्ष उभा राहण्यासाठी काम करु. येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर उद्धव ठाकरेंना बसल्याशिवाय राहणार नाही, असेही अद्वय हिरे म्हणाले.

शिवसेना सोडून लोकं निघून जात असल्याचा गैरसमज आहे. गेलेल्या गद्दारांना जनता धडा शिकवणार आहे. मी बाहेर पडलोय, ४९ मतदासंघातील भाजपाचे नेते बाहेर पडण्यासाठी थांबले आहेत. तिथे त्यांची कुचंबना होत आहे. निवडणूका जाहीर झाल्यावर ४९ मतदारसंघातून हे लोक शिवसेनेत प्रवेश करतील, असेही ते म्हणाले.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page