मुंबई – मध्य रेल्वेकडून ठाणे आणि सीएसएमटी स्थानकांत ६३ आणि ३६ तासांचा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील फलाट क्रमांक १० व ११ च्या रुंदीकरणासह ठाणे येथील फलाटांच्या कामासाठी शुक्रवार, शनिवार आणि रविवारी मध्य रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावर विपरित परिणाम होणार असून, तिन्ही दिवशी एकूण ९३० लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत.
गुरुवारी (३० मे २०२४) रात्रीपासून ते रविवारी (२ जून २०२४) दुपारपर्यंत ठाण्यातील ब्लॉक सुरू असेल. शुक्रवारी (३१ मे २०२४) रात्रीपासून ते रविवारी (२ जून २०२४) दुपारपर्यंत सीएसएमटी येथे ब्लॉक असेल. या कालावधीत ७४ रेल्वे गाड्या रद्द होणार असून १२२ रेल्वेगाड्या अंशत: रद्द होणार आहेत.