पुणे – पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलगा वेदांत अग्रवालचे वडील आणि पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने छत्रपती संभाजीनगरमधून विशाल अग्रवाल यांना ताब्यात घेतले.

पुण्यातील कल्याणीनगर परिसरात भरधाव वेगात असलेल्या पोर्श कारने दोघांना उडवलं, या घटनेत दोन अभियंत्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपी अल्पवयीन असून त्याला न्यायालयाने काही तासांत जामीन मंजूर केला. तर या प्रकरणात पोलिसांनी मुलाच्या वडिलांसह पबमध्ये प्रवेश देणाऱ्या हॉटेल कोझीचे मालक प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन काटकर, हॉटेल ब्लॅकचे मालक संदीप सांगळे, बार व्यवस्थापक जयेश बोनकर यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच या अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल हे फरार झाले होते. दरम्यान, आरोपीच्या वडिलांना छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे.