नवी दिल्ली – व्हीव्हीपॅट पडताळणीसाठी करण्यात आलेल्या सर्व याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावल्या आहेत. मतपत्रिकेची मागणी करणाऱ्या याचिकाही कोर्टाने फेटाळून लावल्या आहेत. ईव्हीएमच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या मतांची व्हीव्हीपॅटच्या पावत्यांसोबत १०० टक्के पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र ही मागणी कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे ईव्हीएम मशिनवरतीच निवडणुका होणार आहेत, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने हा निकाल दिला.
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालात म्हटले आहे की, VVPAT स्लिप ४५ दिवस सुरक्षित राहील. या स्लिप उमेदवारांच्या स्वाक्षरीने सुरक्षित ठेवल्या जातील. निवडणुकीनंतर ईव्हीएम युनिट्सही सील करून सुरक्षित ठेवावे. निकाल जाहीर झाल्यानंतर तांत्रिक पथकाकडून ईव्हीएमची सूक्ष्म तपासणी करण्याचा पर्याय उमेदवारांकडे असणार आहे. निवडणुकीच्या निकालानंतर सात दिवसांत उमेदवारास असे करता येणार आहे.