नवी दिल्ली – शरद पवारांचे नाव आणि फोटो वापरू नका असे आदेश सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला दिले आहेत. अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या शरद पवार यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती केव्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली .
अजित पवार गटाला सुप्रीम कोर्टाने शरद पवार यांची छायाचित्रे प्रचार साहित्यात का वापरत आहेत? असा सवाल केला. शरद पवार यांच्या नावाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष वापर करणार नाही, असे हमीपत्र दाखल करण्यासही कोर्टाने अजित पवार गटाला सांगितले. अजित पवार गटाने ‘घड्याळ’ व्यतिरिक्त दुसरे चिन्ह वापरावे, असेही कोर्टाने तोंडी सांगितले.आजच्या सुनावणीत शरद पवार गटाकडून वकिल अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तीवाद केला. यामध्ये त्यांनी अजित पवार शरद पवारांचा फोटो आणि घड्याळ कसं वापरतात? ही फसवणूक आहे,आमच्या लोकप्रियतेचा वापर का केला जातो आहे? असा सवाल उपस्थित केला. तसेच ग्रामीण भागात लोक म्हणत आहेत की घड्याळाला मत द्या. अजित पवार गटाचे पोस्टर्स पाहा, त्यावर शरद पवारांचा फोटो आहे.असे म्हणत अभिषेक मनु सिंघवी यांनी अजित पवार गटाचे पोस्टर्सही न्यायालयात दाखवले.
या प्रकरणाची पुढील सुनावणी 18 मार्चला होणार आहे.