ठाणे – आंतरराज्य घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या बांग्लादेशी टोळीस मालमत्ता कक्ष, गुन्हे शाखेने अटक करून एकूण ५३ गुन्हे उघडकीस आणले.
याबाबत वृत्त असे आहे कि, मालमत्ता कक्ष, गुन्हे शाखेकडून घरफोडीच्या गुन्हयातील पाहिजे आरोपी आणि सराईत गुन्हेगार शाकीर उर्फ गुड्डू हैदर शेख याचा मागील १ वर्षापासून महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तेलंगना, येथील विविध भागात शोध घेण्यात येत होता. दरम्यान, शाकीर उर्फ गुड्डू हैदर शेख परतूर, जिल्हा जालना येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे पोलिसांनी सदर ठिकाणावरील एका दुमजली घरावर छापा टाकला असता, त्याठिकाणी शाकीर उर्फ गुड्डू हैदर शेख याचे सोबत त्याचे इतर साथीदार असल्याचे आढळून आले. पोलिसांनी एकूण सहा जणांना अटक करून मोटार कार, कटावनी, स्क्रू ड्रायव्हर, चॉपर, कोयता असा माल जप्त केला.
शाकीर शेख उर्फ गुड्डु याच्या विरोधात मुंबई व आजुबाजुच्या परिसरात सुमारे ३० घरफोडीचे गुन्हे नोंद आहेत. त्याने घरफोडी करण्याकरीता आंतरराज्यीय टोळी बनविली असून तो विमानाने प्रवास करुन पश्चिम बंगाल, गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा या राज्यातील विविध शहरांमध्ये जावून रेकी करुन घरफोडीचे गुन्हे करीत असे. त्याकरीता तो दरवेळी नवनविन सिमकार्ड व मोबाईल फोनचा वापर करीत होता. चोरी केल्यानंतर सदर आरोपीत लगेच पश्चिम बंगाल मार्गे बांग्लादेश येथे पळून जात असत.
याप्रकरणी पोलिसांनी घरफोडीचे मुंबईतील १८ गुन्हे, भुसावळ व जालना जिल्हयात ०३ गुन्हे, तसेच तेलंगणा निजामाबाद येथे १३ गुन्हे, तेलंगणा-हैदराबाद येथे ०७ गुन्हे, गुजरात-अहमदाबाद येथे ०४ गुन्हे, पश्चिम बंगाल हावडा, वर्धमान याठिकाणी ०७ गुन्हे असे एकूण ५३ गुन्हे उघडकीस आणले आहेत.