डोंबिवली – महाराष्ट्र न्यूज आयोजित ‘कर्तव्य जननी’ सन्मान सोहळा डोंबिवली येथे उत्साहात पार पडला.
जागतिक महिला दिन आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून महाराष्ट्र न्यूजच्या वतीने विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या तसेच उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांसाठी ‘कर्तव्य जननी’ सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमात सुप्रसिद्ध कवी अशोक नायगावकर (प्रमुख पाहुणे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष), सुधाकर सुराडकर (माजी पोलीस महासंचालक), डॉ. सुषमा बसवंत (सामाजिक कार्यकर्त्या आणि कार्यक्रमाच्या प्रमुख प्रवक्त्या), भूषण कडू (सुप्रसिद्ध अभिनेता), डॉ. सुनील खर्डीकर (महाराष्ट्र न्यूज सल्लागार) अशी दिग्ग्ज मान्यवर उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र न्यूजच्या संपादिका अमृता पाटणकर यादेखील व्यासपीठावर उपस्थित होत्या.
या सर्व मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या तसेच उल्लेखनीय काम करणाऱ्या एकूण ५६ महिलांना ‘कर्तव्य जननी’ सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमात सुप्रसिद्ध कवी अशोक नायगावकर यांनी आपल्या भाषणात हसवता हसवता स्त्रियांचे आजचे जीवन कसे आहे याचे वास्तव मांडले. तसेच माजी पोलीस महासंचालक सुधाकर सुराडकर यांनी महिलांना सुरक्षेविषयी मार्गदर्शन केले आणि कार्यक्रमाच्या प्रमुख प्रवक्त्या डॉ. सुषमा बसवंत यांनी आपल्या भाषणात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट कसा होता हे सांगितले. तसेच सावित्रीबाई फुले यांना अजूनही भारतरत्न मिळाला नाही याची खंत व्यक्त केली.
कार्यक्रमात अनेक नागरीक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन सुरेश व्हावळ, राम सावंत, अनिल यादव, त्रिशूल उमाळे, प्रविण बेटकर या सर्व महाराष्ट्र न्यूजच्या टीमने केले होते. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण गायकवाड (शिवा) यांनी केले.