धाराशिव – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार गुवाहाटीला असताना आमदारांनी गुवाहाटीच्या हॉटेलात एअर होस्टेसवर अत्याचाराचा प्रयत्न केला होता, असा गंभीर आरोप ऍड असीम सरोदे यांनी केला आहे. ते धाराशिव येथे निर्भय बनो या कार्यक्रमात बोलत होते.
सरोदे म्हणाले कि, गुवाहाटीच्या हॉटेलमधून एक आमदार पळून गेला, मात्र ८ किलोमीटरवरून त्यांना परत पकडून आणण्यात आले. त्यानंतर त्या गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये त्यांना प्रचंड मारहाण करण्यात आली. तसेच आणखी एका आमदाराला मारहाण झाली. त्या दोन्ही आमदारांना कोणी मारहाण केली हा प्रश्न पत्रकारांसाठी आहे.
तसेच गुवाहाटीच्या ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, त्या हॉटेलमध्ये इतर कोणत्याही ग्राहकांना परवानगी नव्हती. परंतु, स्पाईस जेट व इंडिगो या कंपनीकडून आधीपासूनच या हॉटेलमध्ये काही रूम बुक करण्यात आलेल्या होत्या. त्यांचा तो वार्षिक करार होता. त्यामुळे हॉटेलच्या वरच्या मजल्यावर काही एअर होस्टेस राहत होत्या. माझा प्रश्न आहे, त्या हॉटेलच्या लिफ्टमध्ये एअर होस्टचा विनयभंग व लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न कोणी केला? हे महाराष्ट्राने शोधले पाहिजे. याचं खरं चरित्र आपल्या समोर येईल. दारूच्या नशेत झिंगत असलेले हे नेते आज जरी मोठ्या-मोठ्या मंत्री पदावर बसले असले, तरीही या पैशाचा खेळ आता महाराष्ट्रात चालू द्यायचा नाही, असे सरोदे म्हणाले.