डोंबिवली – जबरी चोरीच्या गुन्हयातील एका आरोपीवर डोंबिवली पोलिसांनी एम.पी.डी.ए. कायद्यान्वये कठोर कारवाई करून त्याला १ वर्षासाठी कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह, कळंबा, कोल्हापूर येथे ठेवण्यात आले आहे.अक्षय किशोर दाते असे याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय दाते यास काही महिन्यांपूर्वी एका व्यक्तीस चाकूचा धाक दाखवून मारहाण करणे आणि त्याच्याकडून जबरदस्तीने पैसे, इतर वस्तू घेतल्याबाबत डोंबिवली पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान, अक्षय जामिनावर सुटून बाहेर आला होता. आणि त्यानंतरही तो जबरी चोरी, शिवीगाळी, दमदाटी करुन मारहाण करणे, घातक शत्र वापरुन दंगा करणे, घातक शस्त्र जवळ बाळगणे, जीवे ठार मारण्याची धमकी देणे असे शरीराविरुध्द्/मालमत्ते विरुध्दचे भा. दं. वि. प्रकरण १६ व १७ खालील गंभीर स्वरुपाचे गुन्हे, तसेच भारतीय हत्यार अधिनियम भाग ५ असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करत आहे. त्याच्यावर एकूण १० गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने पोलिसांनी हि कारवाई केली.
सदरची यशस्वी कामगिरी दत्तत्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, कल्याण, सचिन गुंजाळ, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३, कल्याण, सुनिल कुराडे, सहायक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि नितीन गिते, सपोनि बळवंत भराडे, पोहवा अनंत डोके, पोना दिलीप कोती, पोना शरद रायते, पोहवा विशाल वाघ, पोहवा सुनिल भणगे, पोहवा निसार पिंजारी, (नेम- कोळसेवाडी पो. ठाणे), पो.शि शिवाजी राठोड, पोशि देविदास पोटे यांनी केली.