पुणे – राज्य उत्पादन शुल्क विभागाने बनावट दारूच्या ६० हजार बाटल्या जप्त केल्या आहेत. जुन्या मुंबई पुणे मार्गावर असलेल्या मामुर्डी गावाजवळ ही कारवाई केली असून, वाहनासह एकूण ३६ लाख रुपये किंमतीचा माल जप्त केला.
एक ट्रक जुना मुंबई पुणे हायवे रोडवर, मामुर्डी गावाजवळ येथून जाणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने सापळा रचून सदर ट्रक अडवला असता, त्या ट्रकमध्ये गोवा राज्य निर्मित बनावट देशी दारूचा संत्रा ९० मि.ली. क्षमतेच्या ६०,००० बाटल्या (६०० बॉक्स) मिळून आल्या. याची किंमत २१ लाख रुपये इतकी आहे. दरम्यान, याप्रकरणी विभागाने १५ लाखाच्या वाहनासह एकूण ३६ लाख रुपये किंमतीचा माल जप्त केला.
तसेच गोव्याच्या ज्या ठिकाणी बनावट देशी दारू बनवली जाते त्याठिकाणी जाऊन देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. या कारवाईत बनावट देशी दारू तयार करण्यासाठी लागणारे १ लाख ३४ हजार ९८५ रुपयांचे साहित्य जप्त केले आणि दोघांना अटक केली.