ठाणे – दुकाने व विविध आस्थापनांचे नामफलक मराठीत ठळक अक्षरात लावण्याचे आदेश मा. सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. याबाबत उद्योग, उर्जा व कामगार विभागाकडून प्रसिद्ध झालेल्या अधिसूचननेनुसार महापालिका, नगरपंचायत व नगरपरिषदेला कारवाई अधिकार प्रदान करण्यात आले आहे. त्यानुसार दुकाने व विविध आस्थापनांच्या मराठी पाट्यांची तपासणी यापुढे महापालिका करणार असून महापालिका कार्यक्षेत्रातील विविध प्रभागसमित्यांमधील दुकाने व आस्थापनांच्या पाट्या मराठीत आहेत किंवा नाही याची खातरजमा करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सर्व प्रभाग समिती सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.
मा. सर्वोच्च न्यायालयात याचिका क्रमांक 775/2022 व स्पेशल लिव्ह पिटीशन क्र.10629/2022 दाखल करण्यात आल्या होत्या, यावर दिनांक 25/09/2023 रोजी सर्वोच्च न्यायालयाने आदेश पारित केले आहेत. त्यानुसार महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम 2017 मधील कलम 36 क नुसार दुकाने व आस्थापना यांचे नामफलक मराठीत असणे बंधनकारक असून उद्योग, उर्जा व कामगार विभागाकडून प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेत ज्याचे नामफलक मराठी भाषेत नसतील अशांवर कारवाई करण्याचे अधिकार महापालिका, नगरपंचायत व नगरपरिषदेला देण्यात आले असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील नऊ प्रभागसमितीच्या सहाय्यक आयुक्तांवर सदरची जबाबदारी निश्चित करण्यात आली असून त्यांच्यामार्फत दुकाने व आस्थापना यांचे नामफलक मराठी (देवनागरी) लिपीत असतील याची तपासणी करण्यात येणार आहे.
ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात असले्ल्या प्रत्येक आस्थापनेचा नामफलक देवनागरी लिपीतील म्हणजेच मराठी भाषेमध्ये निश्चित केलेल्या आकारापेक्षा लहान असणार नाहीत अशाप्रकारे लावणे बंधनकारक आहेत. तसेच प्रत्येक आस्थापनेचा नामफलक देवनागरी मराठी भाषेतील जरी असेल तरी त्यावरील अक्षर लेखन हे नामफलकावर सुरुवातीलाच मराठी भाषेत असणे देखील आवश्यक आहे. तसेच मराठी भाषेतील अक्षरांचा टंक (font) हा इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा लहान असणार नाही याची संबंधित सहाय्यक आयुक्तांनी कार्यवाही करताना खबरदारी घ्यावयाची असहेही आयुक्त अभिजीत बांगर यांनी नमूद केले आहे.
महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम 2017 मधील कलम 36 क नुसार ठामपा क्षेत्रातील जी दुकाने तसेच आस्थापना यांचे नामफलक मराठी देवनागरी भाषेत नसतील अशांवर कारवाई करताना सर्व आवश्यक बाबी तपासून घेण्याच्या सूचनाही सहाय्यक आयुक्तांना देण्यात आल्या आहेत. तसेच महापालिका क्षेत्रातील सर्व दुकान मालकांनी व आस्थापनांनी अधिनियमांचे पालन करुन नामफलक मराठी देवनागरी लिपीत करुन घेवून महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.