ठाणे – ठाणे महापालिकेस भातसा नदीवरील पिसे बंधाऱ्यातून 250 द.ल.लि. प्रतिदिन पाणीपुरवठा करण्यात येत आहे. बृहन्मुंबई म.न.पा मार्फत पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टिममधील एअर ब्लॅडर बदलण्याचे काम दि. 20/11/2023 ते 02/12/2023 या कालावधीत हाती घेण्यात येणार आहे, परिणामी या दरम्यान बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी होणार आहे. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेस बृहन्मुंबई महानगरपालिकामार्फत होणाऱ्या पाणीपुरवठ्यात 10% कपात लागू होणार आहे. त्यामुळे कोपरी, हाजुरी, गावदेवी, पांचपाखाडी, टेकडीबंगला, किसननगर 1-2, भटवाडी या भागात झोनिंगद्वारे 10 % पाणी कपात लागू होणार आहे.
तसेच पिसे बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी होणार असल्याने 10% पाणी कमी उपलब्ध होणार असल्यामुळे ठाणे शहरातील दर पंधरा दिवसातून झोनिंगद्वारे होणाऱ्या पाणी कपातीची वेळ वाढवून 12 तास ऐवजी 24 तास करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी कपातीपूर्वी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत करण्यात येत आहे.