ठाणे – सोनसाखळी चोरी करणाऱ्या २ मोस्ट वॉन्टेड आरोपींना मध्यवर्ती पोलीस ठाणे आणि महात्मा फुले चौक पोलीसांनी अटक केली. अब्दुल्ला संजय ईराणी उर्फ सय्यद आणि सौरभ उर्फ सोन्या मनोज साळुंके अशी या दोघांची नावे आहेत.
फिर्यादी संजय नैनवाणी हे मोटार सायकलवर अंबरनाथ येथून येत असताना आनंदनगर फर्स्ट गेट, उल्हासनगर, ३ येथे आले असता त्यांच्या मागून मोटार सायकल वरील २ इसमांनी फिर्यादी यांना ‘गुरुव्दारा कुठे आहे’ असे विचारले असता फिर्यादी यांनी सदर मोटार सायकल वरील इसमांना उजवे बाजूने जाण्यास सांगीतले व थोडया अंतरावर पुढे गेले असता सदर २ इसम पुन्हा फिर्यादी यांच्या जवळ आले व मोटार सायकलवरील मागे बसलेल्या इसमाने फिर्यादींच्या गळ्यातील १८ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन जबरीने खेचून फिर्यादी यांना पोलीस कम्प्लेंट किया तो छोड़ेंगे नही’ अशी धमकी देवून पळून गेले म्हणून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून अब्दुल्ला संजय ईराणी उर्फ सय्यद यास परभणी येथून अटक केली.
तसेच महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे हद्दीत २ अनोळखी इसमांनी मोटार सायकलवर येऊन १) कल्याण (प) छत्री बंगला, ओक केक शॉप समोरील रोडवर २) कल्याण (प) कोकण वसाहत, मयुर बार समोरील गेडवर, ३) कल्याण (प), पौर्णिमा चौक, किशोर बाटा शोरूम जवळ रोडवर, ४) कल्याण पूर्व वालधुनी ब्रिजजवळ याठिकाणी रोडवरुन जाणाऱ्या महिलांना चाकूचा धाक दाखवून धमकी देऊन गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र / सोनसाखळी जबरीने खेचून जबरी चोरी करुन पळून गेले होते. सदर घटनांबाबत महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास केला असता, सदरचे गुन्हे हे सोन्या साळुंखे याने त्याच्या साथीदारासोबत केले असून, तो खडवली भागात येणार असल्याची माहीती मिळाल्याने पोलिसांनी सादर ठिकाणी सापळा रचला असता, गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, सोन्या साळुंखे हा त्याचे रहाते घरी मौजे सोरगांव, पो. आन्हे, ता. भिवंडी, जि. ठाणे येथे आला आहे. पोलिसांनी तेथे जाऊन सापळा रचून सौरभ उर्फ सोन्या मनोज साळुंके यास अटक केली.
दरम्यान, अब्दुल्ला संजय ईराणी उर्फ सय्यद आणि सौरभ उर्फ सोन्या मनोज साळुंके या दोघांकडे केलेल्या चौकशीत त्यांनी एकूण ११ गुन्हे केले असल्याची कबुली दिली आहे.