डोंबिवली – कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची बदली करण्यात यावी अशी मागणी डोंबिवलीतील सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण हजारे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत अनेक नागरी सुविधा पुरविण्यात आयुक्तांना अपयश आले असून एकही चांगले काम त्यांच्याकडून झाले नसल्याचा आरोप हजारे यांनी केला आहे.
पहा सविस्तर …
खड्डेमय रस्ते, आरोग्य सुविधांचा अभाव, अनधिकृत होर्डिंग, फेरीवाले, अतिक्रमण करणारे, अनधिकृत बांधकामे असे अनेक प्रश्न जैसे थे च आहेत. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील रस्त्यांवर गेल्या अनेक वर्षांपासून खड्ड्यांचे साम्राज्य आहे. पावसाळा जवळ आला कि, तात्पुरती रस्त्याला मलमपट्टी करायची असे अनेक वर्ष झाले महापालिका हेच करत आहे. शिवाय गणेशोत्सवाच्या पार्श्ववभूमीवर शहरातील सर्व खड्डे बुजवण्यात येतील असे स्वतः आयुक्तांनी म्हंटले होते. परंतु आता गणपती विसर्जनाची वेळ आली पण अजूनही कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील एकही खड्डा बुजवण्यात आलेला नाही. असे हजारे यांचे म्हणणे आहे.

आरोग्य सेवेचे तर तीन तेरा वाजलेले आहेत. नागरिकांना कोणत्याही सेवा सुविधा पोहोचवल्या जात नाहीत. अनधिकृत होर्डिंग्जमुळे शहराचे विद्रुपीकरण झाले आहे. रेल्वे स्टेशनच्या १०० ते १५० मीटर परिसरात फेरीवाल्यांना मनाई आहे. तरी सुद्धा हे फेरीवाले स्टेशन परिसरात सर्रासपणे रस्त्यांवर, फुटपाथवर धंदा लावतात अतिक्रमण करतात त्यातच त्याठिकाणी रिक्षा देखील मोठ्या प्रमाणात असतात. याचा नाहक त्रास येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना, प्रवाशांना सहन करावा लागतो. स्टेशन परिसरात फेरीवाले, रिक्षाचालक यांची गर्दी होत असल्याने प्रवाशांना चालणे मुश्किल होते. प्रवाशांना रोजच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.
अनधिकृत बांधकाम यांचे जाळे तर कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत दुरवर पसरलेले आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आदेश देऊनही अजूनही अनेक प्रभाग क्षेत्रात अनधिकृत बांधकामांवर कारवाई झालेली नाही. पालकमंत्र्यांच्या आदेशाची साधी दखल सुद्धा आयुक्तांनी घेतलेली नाही असे हजारे यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आयुक्तच जर अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष करत असतील तर प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांकडून काय अपेक्षा करणार असे हजारेंचे मत आहे. हे प्रश्न तर आहेत, याशिवाय अन्य प्रश्न सोडवण्यातही आयुक्त यशस्वी नाहीत. त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेचे तीन तेरा वाजवणारे असे आयुक्त सक्षम नसल्याने त्यांना या पदावर राहण्याचा काही अधिकार नाही, अशा आयुक्तांची तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी लक्ष्मण हजारे यांनी केली आहे.