सोलापूर – महसूलमंत्री व सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर धनगर समाज आरक्षण कृती समितीने भंडारा उधळला. शासकीय विश्रामगृहात हि घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार विखे पाटील हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, ते शासकीय विश्रामगृहात थांबले होते. त्यावेळी धनगर कृती समितीचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते कित्येक वर्ष प्रलंबित असलेल्या धनगर आरक्षणासंदर्भातील निवेदन देण्यासाठी आले होते. त्यांनी विखे पाटील यांना निवेदन दिले.
हे निवेदन विखे पाटील वाचत असताना या कार्यकर्त्यानी अचानक खिशातून भंडारा काढला आणि तो राधाकृष्ण विखे पाटलांच्या अंगावर उधळला. तेवढ्या विखे पाटलांच्या सुरक्षारक्षकांनी आणि उपस्थित पोलिसांनी धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्यांना अडवले आणि बाहेर आणले. कार्यकर्त्यांना थांबवताना त्यांना काही प्रमाणात मारहाणही करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.