ठाणे – महाराष्ट्र राज्य विद्युत विज वितरण कंपनीच्या कल्याण भरारी पथकातील सहाय्यक अभियंत्यासह तिघांना ७०,०००/- रु. लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.
हेमंत तिडके असे सहाय्यक अभियंताचे नाव असून ते कल्याण येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL) कार्यालयात कार्यरत आहे. तर सागर ठाकूर हे कनिष्ठ लिपिक, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि. अंबरनाथ उपविभाग येथे कार्यरत आहेत तसेच पांडुरंग सुर्यवंशी प्रधान तंत्रज्ञ, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, उल्हासनगर उपविभाग-२ आणि नितीन साळवे, खाजगी इसम असे हे चौघेजण आहेत.
तिडके यांनी भरारी पथकाद्वारे तक्रारदार हे राहत असलेल्या घराच्या लाईट मीटर ताब्यात घेऊन तपासणी करून त्यामध्ये छेडछाड झाली असून गेल्या 3 वर्षाचे लाईट बिल दंडासह 3 ते 4 लाख रुपये भरावे लागतील असे सांगितले. परंतु एवढी रक्कम भरायची नसेल तर फक्त 1 लाख पर्यंत बिल पाठवितो असे सांगून तिडके यांनी 75,000 रू लाच रक्कमेची मागणी केली.
सदर बाबत तक्रार मिळाल्यानंतर पडताळणीवेळी हेमंत तिडके, सागर ठाकूर, पांडुरंग सुर्यवंशी यांनी तडजोडीअंती 70,000/- रु. लाचेची ची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने एसीबीने सापळा कारवाईत पांडुरंग सुर्यवंशी यांनी लाचेची 70,000 रू रक्कम स्वीकारून ती खाजगी इसमाकडे दिली असता या दोघांसह सागर ठाकूरला रंगेहाथ पकडले. तसेच हेमंत तिडके यांना देखील ताब्यात घेतले.