जालना – अंतरवाली सरटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. या भेटीत राज ठाकरे यांनी जोरदार टिका केली. गेंड्याच्या कातडीच्या लोकांसाठी आपला जीव गमावू नका असे राज ठाकरे म्हणाले.
मागे जेव्हा मराठा मोर्चे निघाले तेव्हाचं म्हणालो होतो, तुम्हाला आरक्षण मिळणार नाही. हे सर्व राजकारणी तुमचा वापर करून घेतील, मत पाडून घेतील. हा मुद्दा सुप्रीम कोर्टाचा आहे. ते सतत तुम्हाला आरक्षणाचं अमिष दाखवून झुलवत ठेवणार आहे. कधी हे सत्तेत कधी ते विरोधात. सत्तेत आले की, तुमच्यावर गोळ्या झाडतात, असे राज ठाकरे म्हणाले.
तुम्ही पोलिसांना दोष देऊ नका. पोलिसांना लाठीचार्जचे आदेश ज्यांनी दिले, त्यांना दोष द्या. पोलीस काय करणार? ते तुमच्या आमच्यातलेच आहेत. समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याच्या नावाखाली तुमच्याकडे मत मागितले होते. मी तेव्हाच सांगितल होत की, हे शक्य नाही. आपले गडकिल्ले सुधारले पाहिजे.
दरम्यान तुमच्यासमोर आरक्षणाच आणि पुतळ्याच राजकारण केल जात. मी आज तुमच्यासमोर भाषण कऱण्यासाठी आलो नाही. ज्या लोकांनी तुमच्यावर काठ्या आणि गोळ्या चालवल्या त्यांच्यासाठी मराठवाडा बंद करून टाका, असेही राज ठाकरे म्हणाले. देवेंद्र फडणवीस म्हणतात, याच राजकारण करू नये, का करू नये, तुम्ही काय केल असत, असा प्रश्नही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
गेंड्याच्या कातडीच्या लोकांसाठी आपला जीव गमावू नका. त्यांच्यासाठी एकजण गेला तर फरक पडत नाही. आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. या लोकांच्या नादी लागू नका. आता निवडणुका नाहीत. मात्र निवडणुका आल्या की, काठीचा हल्ला लक्षात ठेवा, काठीचे व्रण विसरू नका, असेही राज ठाकरे म्हणाले.
मी आज राजकारण करायला या ठिकाणी आलेलो नाही. पण जी दृश्यं मी पाहिली, ज्या प्रकारे माता-भगिनींवर लाठ्या चालवल्या गेल्या ते बघवलं नाही म्हणून मी जालन्यात आलो. मी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन यातून काय मार्ग काढता येतो ते पाहतो. मी खोटी आश्वासनं देत नाही, मला खोटं बोलायला, आमिषं द्यायला आवडत नाही असेही राज ठाकरे म्हणाले.