जालना – अंतरवाली सराटी येथे झालेल्या लाठीचार्जच्या घटनेनंतर पोलीस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवले असून अपर पोलीस अधिक्षक आणि उपअधीक्षकांची जिल्ह्याबाहेर बदली करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलडाणा येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना दिली.
मराठा आरक्षणासाठी आंदोलनाला बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यामुळे या घटनेच्या विरोधात राज्यभरात संतापाचे वातावरण पाहायला मिळत होते. तसेच लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली जात होती. याची दखल घेण्यात आली असून, जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे तर अपर पोलीस अधिक्षक आणि उपअधीक्षकांची जिल्ह्याबाहेर बदली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच या लाठी हल्ला प्रकरणाची चौकशी राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सक्सेना यांच्यामार्फत केली जाणार आहे. ते जालना येथे जाऊन ही चौकशी करणार आहे. दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.