ठाणे – अन्न व औषध प्रशासनास प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे अन्न प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मे. रिषी कोल्ड स्टोरेज, तुर्भे एमआयडीसी येथे अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 अंतर्गत तपासणी केली असता, तेथील कोल्ड स्टोरेजमध्ये हलक्या दर्जाचे मसाले पावडर व लवंग पावडर तयार करण्यासाठी व लवंगमध्ये भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लवंग कांडीचा मोठ्या प्रमाणात साठा केलेला आढळला. तपासणीनंतर लवंग कांडीचा 160111 किलोचा साठा जप्त करण्यात आला असून जप्त लवंग कांडीच्या साठ्याची एकूण किंमत 2 कोटी 24 लाख 15 हजार 540 रुपये इतकी आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली आहे.
जप्त केलेला साठा मे. जी. टी. इंडिया प्रा. ली., शॉप नं. बी-५१, एपीएमसी मार्केट, वाशी या आस्थापनेचा असल्याचे उघडकीस आले. हा साठा अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदींचा भंग करणारा असल्याचे आढळून आले. या साठ्यातून एकूण 7 लवंग कांडीचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आलेले आहेत. अन्न नमुन्यांचे अहवाल प्रलंबित असून सदर अहवाल प्राप्त होताच पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांनी विभागाचा कार्यभार घेताच अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेवून अन्न पदार्थाच्या भेसळीच्या अनुषंगे कडक कारवाई घेण्याचे आदेश नुकतेच दिलेले होते. त्या अनुषंगे प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांच्या निर्देशानुसार सह आयुक्त (दक्षता) समाधान पवार व कोकण विभागाचे सह आयुक्त सुरेश देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त (दक्षता/गुप्तवार्ता) उल्हास इंगवले, अन्न सुरक्षा अधिकारी अरविंदकुमार खडके, राहुल ताकाटे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.