डोंबिवली – डोंबिवलीत बनावट कागदपत्रांच्या आधारे वडिलोपार्जित जागा बळकवण्याचा प्रयत्न केला असल्याचे समोर आले आहे. सदर प्रकरणी राम नगर पोलिसांनी २७५/२०२३ भादंवि कलम ४२०, ४६७, ४९८, ४७१, ३४ प्रमाणे चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सीताराम कुंडलिक पाटील, अरुण सीताराम पाटील, तेजस अरुण पाटील, पूनम अरुण पाटील अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चौघांची नावे असून, यातील अरुण सीताराम पाटील आणि तेजस अरुण पाटील या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर सीताराम कुंडलिक पाटील आणि पूनम अरुण पाटील हे दोघे फरार आहेत.

याबाबत वृत्त असे आहे कि, सिताराम कुंडलीक पाटील, अरूण सिताराम पाटील, तेजस अरुण पाटील आणि पूनम अरुण पाटील यांनी फिर्यादी आणि त्यांच्या नातेवाईकांची फसवणूक करून त्यांची वडीलोपार्जीत जागा बळकावण्याच्या उद्देशाने त्यांच्या खोटया सह्या आणि बनावट फोटो वापरून तसेच जनार्दन कुंडलीक पाटील, सुनंदा अनंत म्हात्रे, तारा गौरू काठे हे मयत असताना सुध्दा त्यांच्या बनावट सह्या आणि फोटो वापरून मौजे आयरे, ता. कल्याण, जि.ठाणे येथील फिर्यादींची वडीलोपार्जीत जागा या जागेची स्पेशल पावर ऑफ ऍटर्नी सह दुय्यम निबंधक, कल्याण वर्ग २ यांचा बनावट सही शिक्का असलेले खोटे व बनावट रजिस्टर कुलमुखत्यार दस्त केले. त्यानंतर सदर बनावट कुलमुखत्यार आधारे सिताराम कुंडलीक पाटील यांनी मे आर के बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तर्फे भागीदार सागर गणपत भंडारी यांच्या सोबत विकास करार दस्त करून त्यांच्याकडून १५,००,०००/- घेतले. त्यानंतर सदर बनावट कुलमुखत्यार आधारे सिताराम कुंडलीक पाटील यांनी त्यांचा मुलगा अरुण सिताराम पाटील यांच्या लाभात कुलमुखत्यारपत्र करून सदरचे कुलमुखत्यार सह दुय्यम निबंधक, कल्याण ४ यांच्याकडे दस्त नोंदविले असल्याची माहिती समोर आल्याने पोलिसांनी सदर प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, यातील अरुण सीताराम पाटील आणि तेजस अरुण पाटील या दोघांना अटक केली असून, त्यांना १९ ऑगस्ट २०२३ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, गुन्ह्याचा पुढील तपास राम नगर पोलीस ठाण्याचे सपोनि गणेश जाधव करत आहेत.