ठाणे – ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. २६ आणि ३१चा काही भाग वगळून), कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागामध्ये, वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. २, नेहरूनगर, तसेच मानपाडा प्रभाग समितीअंतर्गत कोलशेत खालचा गाव या भागात शनिवार, १२ ऑगस्ट रोजी सकाळी १०.०० ते दुपारी २.०० या कालावधीमध्ये सुमारे ५० टक्के कमी प्रमाणात पाणी पुरवठा होणार आहे.
उल्हास नदीवरील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अशुद्ध पाणी पंपिंग स्टेशनच्या इनलेट स्क्रीन, चॅनल व पंप स्ट्रेनरमध्ये नदीमधून मोठ्या प्रमाणात कचरा आल्याने पंपिंगच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे. हा कचरा काढण्याच्या काळात शनिवार, १२ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दु. २ या कालावधीमध्ये सुमारे ५० टक्के कमी प्रमाणात पाणी पुरवठा होणार असल्याचे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने कळवले आहे. या कालावधीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे पंपिग स्टेशनमध्ये अडकलेला कचरा काढण्याचे काम होणार आहे.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा – मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभाग समितींमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो.पाणी कपातीच्या काळात नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे. तसेच, पावसाळा असल्याने नागरिकांनी पाणी गाळून आणि उकळून प्यावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.