पुणे – पुणे महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनला १० लाख रुपयांची लाच घेताना पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. आशिष श्रीनाथ बनगिनवार असे या डीनचे नाव आहे. पुणे महानगरपालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी १६ लाख रुपये लाचेची मागणी करून त्यातील १० लाख रुपये स्वीकारताना या डीनला रंगेहात पकडण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार यातील तक्रारदार यांचा मुलगा NEET परिक्षा-२०२३ मध्ये उत्तीर्ण झाला होता. त्याची एम.बी.बी.एस.च्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्याच्या पहिला कैंप राऊंडमध्ये पुणे महानगरपालिका वैद्यकिय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकिय महाविद्यालय, पुणे येथे इन्स्टिट्युशनल कोटा मधून निवड झाली होती.
या निवड यादीच्या आधारे तक्रारदार आशिष बनगिनवार (डीन) यांना मुलाच्या एम.बी.बी.एस.च्या महाविद्यालयात प्रवेश प्रक्रीयेसाठी भेटले असता, त्यांनी दरवर्षाची शासनमान्य विहीत फी २२,५०,०००/- (बाविस लाख पन्नास हजार) रुपये व्यतिरिक्त प्रवेशासाठी १६,००,०००/- (सोळा लाख रुपये) लाच मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी ला.प्र.वि. पुणे येथे दिली होती.
त्यानुषंगाने आशिष बनगिनवार (डीन) यांनी तक्रारदार यांच्याकडून तडजोडीअंती १६ लाख रुपये लाच रक्कम म्हणून मागणी करुन, त्यापैकी पहिला हप्ता १०,००,०००/- रुपये (१० लाख रुपये) त्यांच्या कार्यालयात स्विकारल्यावर त्यांना एसीबीने रंगेहाथ पकडले.