मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे दिलीप वळसे-पाटील अजित पवारांसोबत गेल्याने आमदार रोहित पवार यांनी वळसे-पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. रोहित पवार यांनी ट्विट करून शरद पवार यांनी वळसे-पाटलांना आजवर दिलेल्या पदांची यादी दिली आहे. तसेच अजून काय पाहिजे? असेही म्हण्टले आहे.

वळसे-पाटील साहेब आदरणीय पवार साहेबांनी स्वतःच्या मुलाप्रमाणे जपलेला नेता म्हणून तुम्हाला महाराष्ट्र ओळखतो. तुमच्यावर तर साहेबांचा सर्वाधिक विश्वास होता. पण अचानक असं काय संकट आलं की, तुम्हाला आपली निष्ठा गहाण ठेवावी लागली. आपल्या विचारधारेला मूठमाती द्यावी लागली, हे महाराष्ट्राला जाणून घ्यायचंय. केवळ सत्तेसाठी अशा प्रकारची बंडखोरी आपल्या सारख्या ज्येष्ठ नेत्यांकडून अपेक्षित नव्हती. असे रोहित पवार ट्विटमध्ये म्हणाले.
तसेच प्रत्येक संकटावर मात करण्याची ताकद आमच्या #सह्याद्रीत आहे. सह्याद्रीच्या बाजूने संपूर्ण महाराष्ट्र उभा असून हा सह्याद्री नव्या जोमाने आणि नव्या ताकदीने उभा राहीलच, परंतु वळसे-पाटील साहेब तुम्ही स्वतःला तुमच्या या कृतीबद्दल माफ करू शकणार का? असा प्रश्नही रोहित पवार यांनी विचारला आहे.
तसेच तुम्हाला काय केलं होतं कमी? आणि का पत्करली गुलामी? हे हॅशटॅग देखील वापरले आहेत.