मुंबई – राजीनामा मागे घ्यायचा होता तर दिला कशाला? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांना केला आहे. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले.
२ मे ला म्हणाले मी राजीनामा देतो. राजीनामा दिल्यानंतर एक कमिटी करतो, म्हणाले. त्यातच सर्व बसून सुप्रियाला राष्ट्रीय अध्यक्ष करा म्हणाले. त्यालाही आम्ही होकार दिला. त्यानंतर दोन दिवसांनी सांगितलं राजीनामा मागे घेतो. मागेच घ्यायचा होता तर राजीनामा दिला का? असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला.
कॉर्पोरेट जगतात, सरकारमध्ये निवृत्तीचं वय ५८ असते, भाजपमध्ये ७५ वर्षे निवृत्तीचे वय आहे. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आदी मोठे नेते त्या वयानंतर निवृत्त झाले. मात्र इथे तुम्ही ८२ झालं, ८३ झालं, तरी काम करताय, तुम्ही निवृत्त होणार कधी? तुम्ही शतायुषी व्हा. पण आम्हाला कधी संधी मिळणार? आम्ही कोणाच्या पोटी जन्माला आलो नाही ही आमची चूक आहे का? असेही अजित पवार म्हणाले.
महाराष्ट्रातील जनतेने सांगावे आमच्यात सरकार चालवण्याची धमक नाही का? आम्हाला का आशीर्वाद दिला जात नाही. घरात देखील ६० वर्षानंतर २५ वर्षांच्या मुलाला सांगितले जाते, आता तू सर्वकाही पाहायचे, आम्ही तुला सल्ला देतो. हीच सगळीकडे पर्याय आहे. परंतु, आता हट्ट केला जातो. मी सुप्रियाशी बोललो. साहेबांना काही तरी सांग. ती बोलली ते कोणाच ऐकत नाही. असला कसला हट्ट आहे. हे कुठ तरी महाराष्ट्राच्या जनतेला कळले पाहिजे, असेही अजित पवार म्हणाले.
काही आमदारांना बोलवून घेतले जाते. त्यांना भावनिक केले जाते. वरिष्ठ नेते म्हणतात, तु निवडून कसा येतो, अस बोलतात. नरेंद्र मोदींसारखे नेतृत्व देशात आहे. २०१४ मध्ये मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजप सत्तेत आले. परदेशात गेल्यानंतर मोदींचे उत्साहत स्वागत करतात. देशात मोदींशिवाय पर्याय नसेल तर त्यांना पाठिंबा द्यायला काय हरकत आहे, असा सवाल अजित पवार यांनी केला.