मुंबई – उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे.
आम्ही सर्वांनी एक निर्णय घेऊन शिंदे – फडणवीस सरकार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि बहुसंख्य आमदारांनी सहभागी होण्याचा निर्णय घेतला. मी आणि इतर आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. आणखीनही मंत्रिपदाचा विस्तार करण्यात येणार आहे. ते अजित पवार म्हणाले.
सध्या देशपातळीवर जी परिस्थिती आहे आणि राज्याची जी परिस्थिती आहे या सर्वांचा विचार करता विकासाला प्राधान्य दिले पाहिजे असे माझे आणि सर्व सहकाऱ्यांचे म्हणणे होते. त्यातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात जो काही कारभार सुरू आहे, देशाला मजबुतीने पुढे नेण्याचा प्रयत्न मोदी करत आहेत. असा प्रयत्न करत असताना आपण सुद्धा पाठिंबा दिला पाहिजे. सर्व विरोधी पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत पण फक्त बैठका होत आहेत. सर्व राज्यांत वेगवेगळी राजकीय परिस्थिती आहे. बंगालमध्ये काँग्रेस विरुद्ध ममता बॅनर्जी, दिल्ली आणि पंजाबमध्ये काँग्रेस विरुद्ध आम आदमी पार्टी आहे असेही अजित पवार म्हणाले.
इतके दिवस मी विरोधी पक्षनेता म्हणून काम करत होतो. पण शुक्रवारी मी माझ्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला. इथुन पुढे तरुणांना संधी देणं गरजेचं आहे. नवीन कार्यकर्ते पुढे आणले पाहिजेत असा प्रयत्न आमचा सर्वांचा असणार आहे. महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करणं आणि महाराष्ट्रातील जनता समाधानी कशी राहील यासाठी आम्ही अशा प्रकारचा निर्णय घेतला. हा निर्णय बहुतेक आमदार, लोकप्रतिनिधींना मान्य आहे. माझ्यासोबत सर्व आमदार आहेत. वरिष्ठांसोबत चर्चा करुन निर्णय घेतला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच आम्ही या सरकारमध्ये सामील झालो आहोत. पुढेही सर्व निवडणुका म्हणजे आमदारकी, खासदारकी, स्थानिक निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर निवडणूक लढणार आहोत. पुढील काळात आम्ही पक्ष वाढवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत असेही अजित पवार म्हणाले.