छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मडगाव-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे स्वागत…

Published:

मुंबई – मुंबई वंदे भारत एक्सप्रेसमुळे विस्तीर्ण समुद्र किनारा, आंबा, नारळी, पोफळीच्या बागा आणि डोंगर-दऱ्यांनी नटलेल्या कोकणातील पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मडगाव ते मुंबईदरम्यान धावणाऱ्या वंदेभारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखविला. त्यानंतर वंदेभारत एक्सप्रेसचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आगमन झाले. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी वंदे भारत एक्सप्रेसचे लोको पायलट व प्रवाशांशी संवाद साधत त्यांचे मिठाई आणि गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. यावेळी शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, खासदार कृपाल तुमाने, आमदार यामिनी जाधव, मध्य रेल्वेचे महाप्रबंधक नरेश लालवाणी, मुंबई विभागाचे महाप्रबंधक रजनीश गोयल आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई आणि पर्यटनात अग्रेसर असलेल्या गोवा दरम्यान सुरू झालेल्या रेल्वेमुळे पर्यटनाचा शाश्वत विकास होण्यास आणखी मदत होईल. या गाडीत विविध आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे कोकणवासीयांचा प्रवास सुलभ होईल. वंदे भारत एक्स्प्रेस देशात निर्मित असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकारण्यास मदत करणारी आहे. राज्यात रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी केंद्र सरकारने १३ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह १२३ रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे. राज्यातील बुलेट ट्रेनसह अन्य रेल्वे प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी केंद्र सरकारच्या सहाय्याने प्रयत्न सुरू आहेत. बुलेट ट्रेनकरिता भूसंपादनाचे काम सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

मंत्री केसरकर म्हणाले की, कोकणातून येणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचे आगमन होत आहे ही आनंदाची बाब आहे. या रेल्वेत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध आहेत. या माध्यमातून भारत आंतरराष्ट्रीयस्तरावर पोहोचला आहे. कोकण रेल्वेसाठी कोकणवासीयांनी जमीन उपलब्ध करून दिली आहे, असेही त्यांनी सांगितले. खासदार शेवाळे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्यासाठी पाचवी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू केली. गोवा आणि कोकणातील पर्यटनाला यामुळे चालना मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

महाप्रबंधक लालवाणी यांनी सांगितले की, मध्य रेल्वेसाठी आज आनंदाचा क्षण आहे. यापूर्वी छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून शिर्डी व सोलापूरकरीता वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाली आहे. या रेल्वेगाडीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच त्यांनी मडगाव – मुंबई दरम्यान धावणाऱ्या वंदेभारत एक्स्प्रेसची सविस्तर माहिती दिली. या रेल्वेचा मुंबई आणि कोकणवासीयांना लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी लोकप्रतिनिधी, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, नागरिक उपस्थित होते. यावेळी मंडळ सांस्कृतिक अकादमीच्या कलावंतांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page