पाटणा – देशात विचारधारेची लढाई सुरु आहे. एकीकडे काँग्रेसची भारत जोडण्याची विचारधारा आहे, तर दुसरीकडे भाजप आणि RSS ची भारत तोडण्याची विचारधारा असल्याचे काँग्रेस खासदार राहुल गांधी राहुल गांधी म्हणाले. पाटण्यात भाजपविरोधी २३ पक्षांची बैठक होत आहे. या बैठकीसाठी राहुल गांधी पाटण्यात दाखल झाले आहेत. त्यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
सध्या भारतात भारत जोडो आणि भारत तोडो या विचारसरणीमध्ये लढा सुरू आहे. म्हणूनच आज आपण बिहारमध्ये आलो आहोत. काँग्रेसचा डीएनए बिहारमध्ये आहे, असे राहुल गांधी म्हणाले. भारत जोडो यात्रेत तुम्ही मदत केलीत कारण तुम्ही विचारधारेला मानता. भाजप देशाला तोडण्याचे काम करत आहे, द्वेष परवण्याचे काम करत आहे. काँग्रेस पक्ष जोडण्याचे काम करत आहे. द्वेषाला द्वेषाने नाहीतर प्रेमाने मात दिली जाऊ शकते. त्यामुळे आम्ही त्याबद्दल बोलत आहोत. आम्ही सर्व एकत्र मिळून भाजपला हरवणार आहोत.
कर्नाटकमध्ये भाजपने मोठी भाषणे केली पण काय झाले ते तुम्हीसुद्धा पाहिले आहे. तेलंगणा, मध्य प्रदेश राजस्थानमध्ये काँग्रेस निवडून येणार आहे. कारण सगळ्या देशाला कळले आहे की नरेंद्र मोदी आणि भाजपचे काम देशातल्या दोन-तीन लोकांनाच फायदा मिळवून देणे आहे. देशातला सगळा पैसा त्यांच्या हवाली करणे. तर काँग्रेसचा अर्थ म्हणजे गरिबांसोबत उभे राहणे. तुम्ही इथे आलात म्हणून मी तुमचे आभार मानतो, असे राहुल गांधी म्हणाले.