ठाणे – होर्डिंग पडून जीवीतहानी झाल्यास गुन्हा दाखल करणार – आयुक्त बांगर…

Published:

ठाणे – वादळी वाऱ्यामुळे पावसाळ्यात होर्डिंग्ज, झाडे उन्मळून पडणे तसेच झाडाच्या फांद्या पडून जीवीत वा वित्त हानी होवून नुकसान होणार नाही या दृष्टीने शहरातील सर्व होर्डिग्ज व होर्डिग्ज टॉवरचे स्ट्रक्चर ऑडिट करावे. तसेच शहरातील अनधिकृत मेटल स्ट्रक्चर निष्कसित करावीत, शहरातील होर्डिंग्ज पडून जर दुर्घटना घडली तर संबंधित होर्डिंग्ज कंपनीच्या मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व शहरातील अनधिकृत होर्डिंग तात्काळ हटविणे आणि रस्त्यांच्या कडेला असलेल्या व इतर ठिकाणच्या धोकादायक झाडांच्या फांद्यांच्या छाटणीची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्त अभिजीत बांगर यांनी मंगळवारी (13 जून) झालेल्या बैठकीत संबंधित विभागाला दिले आहे.

शहरातील होर्डिंगचे कालबद्ध पध्दतीने स्ट्रक्चरल ऑडिट व्हावे यासाठी कालमर्यादा निश्चित करावी व अस्तित्वातील सर्व होर्डिंग टॉवरचे स्ट्रक्चरल ऑडिट संबंधितांकडून पंधरा दिवसात करुन घ्यावेत.  स्ट्रक्चर ऑडिटनंतर जे होर्डिंग सुरक्षित नसल्याचे आढळल्यास ते  होर्डिंग तात्काळ काढण्याची जबाबदारी ही संबंधित कंपनीची असेल, त्यानंतरही जर एखादी दुर्घटना घडून एखाद्याचा मृत्यू झाल्यास संबंधित कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल. तसेच जे 15 दिवसांत स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल सादर करणार नाहीत अशा होर्डिंगची एक वर्षाची परवानगी रद्द केली जाईल असे आयुक्‌त बांगर यांनी नमूद केले. तसेच परवाना विभागाने शहरातील सर्व  अनधिकृत होर्डिंग्जचा शोध घेवून त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट न करता सदरची होर्डिंग्ज तात्काळ हटविण्याची कार्यवाही करावी.

महापालिकेच्या विविध प्रभागसमिती क्षेत्रात मेटल स्ट्रक्चरच्या माध्यमातून परवानगी न घेता  अनधिकृत होर्डिंग उभारण्यात आले आहेत. अशाप्रकारचे मेटल स्ट्रक्चरवरील होर्डिग 15 दिवसांत प्रभागसमितीनिहाय सर्व सहाय्यक आयुक्तांनी अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या साहा्य्याने हटविण्याची कार्यवाही करावी. कोणत्याही परिस्थितीत होर्डिंग पडून दुर्देवी घटना घडणार नाही याची दक्षता घेवून कार्यवाही करावयाची आहे. भविष्यात  अनधिकृत मेटल स्ट्रक्चर किंवा अनधिकृत होर्डिंग पडून एखादी अप्रिय घटना घडल्यास संबंधित सहाय्यक आयुक्‌तांवर जबाबदारी निश्चित केली जाईल, याबाबत बेजबाबदारपणा चालवून घेतला नाही असा सूचक इशारा देत यावर प्रत्येक परिमंडळ उपायुक्तांचे त्यांचेवर सनियंत्रण राहिल असेही आयुक्त बांगर यांनी नमूद केले.

धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी विनाविलंब पूर्ण करावी

शहरातील झाडांच्या वाढलेल्या फांद्यांची छाटणी महत्वाची असून ती सातत्याने करत रहावी, तसेच शहरातील किती झाडांच्या फांद्या छाटल्या गेल्या याचा दैनंदिन अहवाल घेण्याच्या सूचना वृक्ष प्राधिकरण विभागाला दिले. धोकादायक झाडांचा सर्व्हे करण्यात यावा व यामुळे जीवीत व वित्तहानी होणार नाही याची काळजी घ्यावी. मान्सून कालावधीत ज्या ठिकाणी झाड पडेल त्या ठिकाणचा रस्ता विनाविलंब मोकळा केला जाईल हे सुनिश्चित करावे, यासाठी अग्निशामक दलाशी समन्वय साधावा. आवश्यक असलेले इलेक्ट्रिक कटर व इतर साहित्य पुरेशा संख्येने उपलब्ध ठेवावे. रस्त्याच्या बाजूला झाडांच्या फांद्या कुजेपर्यत पडून राहणार नाहीत याबाबतही दक्षता घेण्याच्या सूचनाही यावेळी आयुक्‌त बांगर यांनी दिल्या.

खाजगी हद्दीतील झाडांच्या फांद्या छाटणेसाठी दर निश्चित करा

खाजगी गृहसंकुलातील व खाजगी जागांवरील धोकादायक झाडे वा फांद्या छाटणे गरजेचे आहे, कारण सदर कामामध्ये खाजगी गृहसंकुलधारकांची पिळवणूक होणार नाही हे पाहणे महानगरपालिकेचे कर्तव्य आहे,  अशाप्रकारे झाडांच्या फांद्या छाटण्यासाठी आपण ठेकेदाराची नियुक्ती केली आहे, या संदर्भात संबंधित विभागाने दर निश्चित करावेत व निश्चित केलेल्या दरापेक्षा एकही रुपया ठेकेदार जास्त घेणार नाही याची खबरदारी घ्यावी. तसेच यामध्ये ठेकेदारामार्फत जास्त पैशाची आकारणी होत असल्यास तात्काळ त्याला काळ्या यादीत टाकावे.

अग्निशामक दलाने कमीत कमी वेळात पोहचणे गरजेचे

पावसाळ्यामध्ये शहरातील कोणत्याही भागात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास अग्निशामक विभागाकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर आवश्यक यंत्रणेसह कमीत कमी वेळेत त्यांनी घटनास्थळी पोहचता येईल या दृष्टीने अग्निशामक विभागाने 24×7 सतर्क राहणे गरजेचे आहे. यासाठी आवश्यक असलेली यंत्रसामुग्री व मनुष्यबळाचे नियोजन करुन एकाच वेळी दोन घटना घडल्‌यास त्यावर नियंत्रण राखता येईल या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही आयुक्त बांगर यांनी बैठकीत दिल्या.

सदर बैठकीस अतिरिक्त आयुक्त 2 संजय हेरवाडे, उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, शंकर पाटोळे, प्रशांत रोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीष झळके, वृक्ष अधिकारी केदार पाटील आदी उपस्थित होते.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page