डोंबिवलीत अतिक्रमण विरोधी पथकाची गाडी नेमकी कोणासाठी?…

Published:

डोंबिवली – डोंबिवली पूर्व केडीएमसी ‘फ’ प्रभाग स्टेशन परिसरातील कैलास लस्सी मंदिर जवळ केडीएमसीच्या अतिक्रमण गाडी समोरच अतिक्रमण वाले बसले असल्याचे चित्र समोर आले आहे. या गाडीत केडीएमसीचे कर्मचारी सुद्धा आहेत. तरीही केडीएमसीचे कर्मचारी या अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करताना दिसत नाहीत. त्यामुळे हि अतिक्रमण विरोधी पथकाची गाडी नेमकी कोणासाठी आहे? असा प्रश्न आता डोंबिवलीकरांना पडला आहे.

अतिक्रमणे, अनधिकृत हातगाड्या व पथारीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी हे अतिक्रमण विरोधी पथक आहे. परंतु हे पथक अनधिकृत हातगाड्या किंवा पथारीवाल्यांवर कारवाई करताना दिसत नाहीत. अतिक्रमण विरोधी पथक कारवाई करणार नसेल तर, मग या पथकाचा उपयोग काय? केडीएमसीने केवळ दिखाव्यासाठी हे अतिक्रमण विरोधी पथक नेमले आहे का? असा सवाल आता नागरीक उपस्थित करत आहेत.

फुटपाथ हे नागरिकांसाठी चालण्यासाठी आहे. पण फूड स्टॉल्स, कपडे, दैनंदिन वस्तू, फळे-भाजी विक्रेत्यांनी फुटपाथवर ताबा मिळवला आहे. त्यामुळे शहरात नागरिकांना चालण्यासाठी फुटपाथच उपलब्ध नसल्याची स्थिती आहे. अतिक्रमणाची दुकाने-ठेले आजूबाजूच्या गल्लीमध्ये उभी करण्यात आली आहेत. पथक येऊन कारवाई करुन गेल्यावर पुन्हा दुकाने थाटली जातात. हे सर्व परिसरातील नागरिकांना दिसते मग केडीएमसीला हे दिसत नसेल का? असा प्रश्न आता निर्माण होत आहे.

याकडे केडीएमसी बघ्याची भूमिका का घेत आहे? डोंबिवली पश्चिम परिसर फेरीवाला मुक्त झालेला आहे. मग डोंबिवली पूर्व फेरीवाला मुक्त कधी होणार याकडे आता नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page