कल्याण – कल्याण लोकसभा मतदारसंघावरून भाजप-शिवसेना युतीत ठिणगी पडल्याचे समोर आले आहे. भाजपचा कल्याणमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मदत न करण्याचा ठराव झाला आहे. भाजपच्या याच भूमिकेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी कल्याणच्या खासदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे.
खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, मी ही स्टेटमेंट ऐकले, मीही पाहिल सोशल मीडियावर, मलाही वाटत की वरिष्ठ पातळीवर जो उमेदवार योग्य असेल, त्याला उमेदवारी मिळेल. मला एवढच सांगावस वाटत, की ही युती एका विचारांनी झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेगळ्या विचारांनी युती केली आणि महाराष्ट्रात सरकार स्थापन केले आहे. मात्र सिनीअर पीआयवर कारवाई होत नाही यासारख्या क्षुल्लक कारणावरुन हे ठराव करतात, की सेनेला सपोर्ट करायचा नाही, कल्याण लोकसभेचा उमेदवार आम्हीच ठरवू, यासारखी आव्हान विचारपूर्वक केली पाहिजेत.
आम्हाला आव्हान देण्याची काम करु नका, कारण शिंदेंनी दहा महिन्यापूर्वी जे केले, त्याचा विचार केला पाहिजे. त्यांनी हे पाऊल उचलले नसते, तर त्याचे काय परिणाम झाले असते, याचा विचार केला पाहिजे, गेल्या नऊ वर्षात युतीमध्ये मी दोन्ही कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन काम करतोय, उल्हासनगरमध्ये ५५ कोटींचा निधी भाजप नगरसेवकांना दिला, हे चांगलं काम सुरु असताना कोणीही युतीत मिठाचा खडा टाकण्याच काम करु नये. युतीसाठी काम करावे, २०२४ मध्ये नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत, यासाठी काम करावे, कुठलाही स्वार्थ मनात ठेवू नये, असे श्रीकांत शिंदे म्हणाले.
मला कुठलाच स्वार्थ नाही, मला जर उद्या कोणी सांगितल की कल्याण लोकसभेचा राजीनामा दे, तर मी राजीनामा द्यायला तयार आहे आणि पूर्णपणे पक्ष आणि युतीचे काम करायला तयार आहे. मला उद्या पक्षनेतृत्व किंवा तुम्ही सांगितल, की तुम्हाला कल्याण लोकसभेसाठी चांगला उमेदवार मिळत आहे, तर तुमच्याप्रमाणेच मीही त्याला निवडून आणण्यासाठी काम करेन. आमचा उद्देश हाच आहे, की २०२४ मध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत, असेही श्रीकांत शिंदे म्हणाले.