तलावपाळी परिसर कायमस्वरुपी फेरीवाला मुक्त ठेवण्याचे निर्देश

Published:

तलावपाळी परिसरातील फेरीवाल्यांसाठी पर्यायी जागा उपलब्ध करुन द्यावी – आयुक्त अभिजीत बांगर

ठाणे – शहराचा मानबिंदू समजला जाणारा परिसर म्हणजे तलावपाळी. ठाणेकरांच्या जिव्हाळ्याच्या असलेल्या या परिसरात दररोज मॉर्निंगवॉक पासून ते संध्याकाळपर्यत नागरिकांची रेलचेल सुरू असते. या परिसरात नागरिकांना मोकळेपणाने फिरता यावे यासाठी सदरचा परिसर हा फेरीवाला मुक्त करण्यात आल्याने नागरिकांनाही मुक्तपणे वावरणे शक्य होत आहे. वर्षानुवर्षे या ठिकाणी असलेल्या नोंदणीकृत फेरीवाल्यांचे योग्य पुनर्वसन होऊन त्यांचे उपजीविकेचे साधन कायम रहावे  याकरिता फेरीवाल्यांसाठी पर्यायी जागा निश्चित करुन त्याचा खाऊगल्ली म्हणून विकास करण्याचे निर्देश आज महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले.

आयुक्त अभिजीत बांगर यांनी संपूर्ण मासुंदा तलावाची पाहणी केली. या पाहणी दौऱ्यास उपायुक्त अतिक्रमण जी.जी. गोदेपुरे, उपायुक्त शंकर पाटोळे, सहाय्यक आयुक्त अजय एडके आदी उपस्थित होते.

सद्यस्थ‍ितीत संपूर्ण तलाव परिसर फेरीवाला मुक्त करण्यात आला आहे. तलावपाळी परिसरातील फेरीवाल्यांसाठी पर्यायी जागा निश्चित करून त्या जागेचा  खाऊ गल्ली म्हणून विकास करण्यात यावा. सदर ठिकाणी पिण्याचे पाणी, विद्युत दिवे आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात मात्र तलावपाळीच्या आजूबाजूचा परिसर कोणत्याही परिस्थितीत फेरीवाला मुक्त राहिल याची दक्षता घेण्याच्या सूचना यावेळी आयुक्त बांगर यांनी दिल्या.

या पाहणी दौऱ्या दरम्यान संपूर्ण मासुंदा तलावाची पाहणी करुन नागरिकांना बसण्यासाठी असलेले कठडे दिवसातून किमान दोन वेळा धुवून स्वच्छ करुन परिसर नीटनेटका राहील याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. तलावाभोवती असलेले सुशोभित विद्युतपोलची आवश्यक देखभाल करुन ते कायमस्वरुपी सुस्थितीत राहतील. तसेच संपूर्ण तलावाभोवती आतील बाजूस एलईडी दिवे लावण्यात यावे, जेणेकरुन त्याचे प्रतिबिंब पाण्यात पडून या परिसराच्या सुशोभिकरणात भर पडेल या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सचूनाही त्यांनी दिल्या. तसेच पाणपोईलगतची जागा स्वच्छ राहिल तसेच पाणपोईची पाण्याची टाकी नियमित स्वच्छ करुन शुद्ध पाणी नागरिकांना मिळेल याकडे लक्ष देण्याच्या सूचना संबंधितांना बांगर यांनी दिल्या.

तसेच तलाव परिसरामध्ये ठिकठिकाणच्या भिंती, उड्डाणपुलाचे खांब, विद्युत ङिपी व कठड्याला जाहिरात पत्रके चिटकविल्याचे दिसून आले, यामुळे या ठिकाणच्या सुशोभिकरणाला बाधा निर्माण होत असल्याची बाब निदर्शनास आली. तरी संपूर्ण तलाव परिसरातील भित्तीपत्रके तातडीने काढून आगामी काळात कोणतीही भित्तीपत्रके लागणार नाही याची दक्षता घेवून दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देशही आयुक्त बांगर यांनी दिले.

ठाणे रेल्वेस्थानक परिसर फेरीवाला मुक्त असावा

ठाणे रेल्वेस्थानकात दररोज 6 ते 7 लाख प्रवाशी प्रवास करत असून पश्चिमेकडील बाजूस 70 टक्के तर पूर्वेकडील बाजूस 30 टक्के प्रवासी ये-जा करतात. त्यामुळे सकाळ व संध्याकाळच्या वेळेस या परिसरात गर्दी असते. या नागरिकांना सुलभतेने ये-जा करता यावी या दृष्टीने 150 मीटरच्या परिसरात एकही फेरीवाला राहणार नाही या दृष्टीने नियोजन करुन पोलीस कर्मचारी तैनात करण्याचे निर्देशही त्यांनी उपायुक्तांना दिले. 

अतिक्रमणावर ठोस कारवाई करा

ठाणे स्टेशन परिसर, तलावपाळी परिसर, नागरिकांची सार्वजनिक वावर असलेली ठिकाणे कायमस्वरुपी मोकळी राहतील या दृष्टीने नियोजन करण्यात यावे. सदर परिसर अतिक्रमणमुक्त करताना थातुरमातुर कारवाई न करता ठोस कारवाई करावी, जेणेकरुन एकदा कारवाई झाल्यावर पुन्हा त्याच जागेवर अतिक्रमण होणार नाही या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्त बांगर यांनी दिले.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page