ठाणे-पर्यटकांना सुरक्षा साधने न दिल्यास ठेकेदारावर होणार कारवाई…

Published:

ठाणे – ठाणे शहरातील विरंगुळ्याचे ठिकाण म्हणजे मासुंदा तलाव. सध्या शाळांना असलेल्या सुट्टयांमुळे बोटिंग सुविधा उपलब्ध असलेल्‌या तलावांवर सायंकाळच्या वेळेस नागरिकांची गर्दी पाहायला मिळते. मासुंदा, उपवन, आंबे-घोसाळे व खारीगांव या तलावांवर महापालिकेच्यावतीने बोटींग सुविधा उपलब्ध असून याचा लाभ आबालवृद्ध घेत आहेत. बोटिंग करताना आवश्यक ती काळजी घेऊन सुरक्षेची साधने नागरिकांना उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे, जेणेकरुन अपघात होवून दुर्देवी घटना घडणार नाही, याकामी नियुक्त ठेकेदाराकडे सुरक्षा साहित्य उपलब्ध असताना देखील ते वापरले जात नाही किंबहुना मर्यादेपक्षा जास्त पर्यटकांची संख्या बोटिंगसाठी घेतली जाते ही अत्यंत गंभीर बाब आहे, याची महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी तातडीने दखल घेवून बोटिंग दरम्यान सुरक्षा जॅकेट व नियमांचे पालन न केल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

मासुंदा तलाव हे ठाणेकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू. शनिवार, रविवार तसेच सुट्टयांच्या दिवशी या तलावांवर बोटींगसाठी नागरिकांची प्रचंड गर्दी असते. सध्या महापालिका क्षेत्रात प्रमुख चार तलावांमध्ये बोटिंग सेवा ठेकेदारामार्फत सुरू आहे. परंतु पर्यटकांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा न पुरविता पेडल बोट उपलब्ध करुन दिल्या जातात. तसेच प्रवासी बोटीत क्षमतेपेक्षा जास्त पर्यटक बसविले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याबाबत आवश्यक ती खातरजमा करुन योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी महापालिकेच्या पर्यावरण विभागाला दिले होते.

त्यानुसार मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी मासुंदा व उपवन तलावाला भेट देवून प्रत्यक्ष वस्तुस्थितीची पाहणी केली. दरम्यान मासुंदा तलावात बोटिंग करताना क्षमतेपेक्षा जास्त पर्यटकांना प्रवासी बोटीत बसविणे, तसेच बोट तलावात असताना बोटीमध्ये सुरक्षा जॅकेटस् व इतर सुरक्षिततेची साधने दिसून आली नाहीत. ही बाब गंभीर स्वरुपाची असून पर्यटकांचा जीव धोक्यात घालणारी आहेत याबाबत संबंधित ठेकेदाराला सक्त सूचना देण्यात आल्या असून बोटींगमध्ये सुरक्षा जॅकेट घातल्याशिवाय बोट पर्यटकांच्या ताब्यात देवू नये, तसेच याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी बोटींग परिसराच्या दर्शनी भागात नियमावली लावण्याच्या सूचना आयुक्त श्री. बांगर यांच्या निर्देशानुसार प्रदुषण नियंत्रण अधिकारी मनिषा प्रधान यांनी मासुंदा व उपवन तलाव येथील बोटिंग सेवा चालविणाऱ्या ठेकेदाराला दिल्या आहेत.

तसेच शहरातील आंबे-घोसाळे तलाव व खारीगांव तलाव येथेही पाहणी करण्याच्या सूचना आयुक्तांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत. बोटिंग सेवेचा ठेका देताना सर्वसाधारण सभेने केलेल्या कराराचा भंग ठेकेदार करीत असल्यास ही बाब अत्यंत गंभीर व नागरिकांच्या जीव धोक्यात टाकणारी  आहे.  महापालिकेने दिलेल्या सूचनांचा भंग झाल्यास सार्वजनिक हिताचा विचार करुन संबंधित ठेकेदाराची बोटिंग सेवा बंद करण्याचा इशाराही आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिला आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page