हल्ल्यात मजूर किरकोळ जखमी…
पालघर – डहाणू तालुक्यातील कोसबाड नजीकच्या लिलकपाडा येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात चिकूवाडीत काम करणारा मजूर सुनील बारक्या वायेडा किरकोळ जखमी झाला. त्याला घोलवड प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारानंतर घरी सोडण्यात आले. तातडीची मदत म्हणून पाच हजार रुपये वन विभागाकडून देण्यात आली.
डहाणू तालुक्यातील कोसबाड नजीकच्या लिलकपाडा येथील चिकू वाडीत सुनील बारक्या वायेडा हा मजूर काम करत असताना बिबट्याने हल्ला केला. डहाणू उपवन संरक्षक कार्यालया अंतर्गत बोर्डी वनपरिक्षेत्रातल्या खुनवडा परिमंडळात हा भाग आहे. या हल्ल्यात किरकोळ जखमी मजुरावर घोलवड प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले असून तातडीची मदत म्हणून पाच हजारांची मदत केल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी आर. एस.सारणीकर यांनी दिली. त्यानंतर वनविभागाच्या पथकसह ग्रामस्थ बिबट्याची शोधमोहीम घेत असताना सुनिल वायेडा यांचा सख्खा भाऊ लक्ष्मण वायेडा यांच्यावर ही बिबट्याने हल्ला केला.त्यामध्ये ते जखमी झाले असून त्यांना डहाणू च्या कॉटेज उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. त्याला ही वनविभागाने तातडीची पाच हजाराची मदत केली.
अचानक या भागामध्ये बिबट्याने दोघांवर हल्ला केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने घटनास्थळी ट्रॅप कॅमेरे लावले असून गस्त घालण्यास सुरू केली आहे. या भागात पहिल्यांदाच हा प्रकार घडला असून वनविभाग अधिकारी व कर्मचारी परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.