उल्हासनगर – उल्हासनगरमध्ये एका नर्सिंग होम मधील महिला डॉक्टर लहान मुलांची विक्री विक्री करत असल्याची माहिती समोर आली आहे. कॅम्प नंबर ३ च्या कवाराम चौक परिसरात असलेल्या महालक्ष्मी नर्सिंग होम मधील डॉक्टर चित्रा चैनानी हि टोळीच्या माध्यमातून नवजात बाळाची खरेदी विक्री करत होत्या.सदर प्रकरणी गुन्हे शाखा घटक १ पोलिसांनी ५ जणांना अटक केली.
कवाराम चौक, उल्हासनगर नंबर ३, जि. ठाणे येथील महालक्ष्मी नर्सिंग होम मधील महिला डॉक्टर चित्रा चैनानी या लहान मुलांची विक्री करीत असल्याची माहिती गुन्हे शाखा घटक १ ठाणे येथे २ महिन्यापुर्वी मिळाली होती. त्याअनुषंगाने पोलिसांनी बनावट ग्राहक म्हणून अनिता कंगारे यांना तयार करून त्यांच्यामार्फत डॉ. चित्रा यांना संपर्क केला होता. त्यानंतर सातत्याने २ महिने सदरबाबत सातत्याने पाठवपुरावा सुरू होता. त्यानंतर डॉ. चित्रा यांनी बनावट ग्राहक अनिता कंगारे यांना फोन करून तिच्याकडे २० दिवसाचा मुलगा विक्री करण्यासाठी आला आहे. त्यासाठी तिने ७,००,०००/- रु. मागणी केली असून सदर मुलास पाहून घ्या व पैसे घेऊन या असे सांगितले.
त्याप्रमाणे पोलिसांनी कारवाई करत डॉ. चित्रा चैनानी, प्रतिभा मगरे, संगीता वाघ, बालकाची आई गंगादेवी योगी, देवन्ना कमरेकर यांना अटक करून त्यांच्या विरुद्ध मध्यवर्ती पोलीस ठाणे, उल्हासनगर येथे गुन्हा नोंद केला. दरम्यान, सदर २० दिवसाच्या बालकास जननी आशिष चारीटेबल ट्रस्ट, डोंबिवली येथे ठेवण्यात आले आहे.