परभणी- सेप्टिक टॅंकची सफाई करताना ५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील भाऊचा तांडा शिवारात घडली. भाऊचा तांडा येथील शेत वस्तीवरील एका घरातील सेप्टिक टॅंकमधील मैला सफाई करताना पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला. तसेच एका कामगारास रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सोनपेठ तालुक्यातील भाऊचा तांडा शेतशिवारात एका घराची सेप्टिक टँकची सफाई करण्यासाठी सफाई कामगार गेले होते. सफाई सुरू असताना त्यातील एक जण टँकमध्ये बेशुद्ध पडला. त्याला वाचविण्यासाठी एकेक करून इतर पाच जण आत गेले. मात्र कोणीच बाहेर येत नसल्याने बाहेरील एकाने आरडाओरडा केला. घटनेची मिळताच सोनपेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर गुदमरून बेशुद्ध झालेल्या सर्वांना बाहेर काढण्यात आले. मात्र यातील पाच जणांचा मृत्यू झाला. तसेच एका कामगारास रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.