डोंबिवली – फेरीवाले आणि दुकानातील एका नोकरामध्ये धंदा लावण्यावरून जोरदार भांडण झाल्याची घटना डोंबिवलीतील टिळक टॉकीज गल्लीत घडली. या भांडणात नोकर जखमी झाला. जितू मल्लाह असे मारहाण झालेल्या नोकराचे नाव आहे. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे आहे कि, टिळक टॉकीज गल्लीतील एका दुकानातील नोकर जितू मल्लाह हा दुकानासमोर धंदा लावत होता. त्यावेळी फेरीवाले बिकेश तिवारी आणि मितेश तिवारी यांनी जितूला तू इथे धंदा लावू नको, असे सांगितले. यावर जितूने त्यांना दुकान मालक सांगेल तिथेच धंदा लावणार असे सांगितले. याचा बिकेश आणि मितेश यांना राग आला. आणि रागाच्या भरात या दोघांनी जितूला शिवीगाळ करत मारहाण केली. या मारहाणीत जितू जखमी झाला.
दरम्यान, या घटनेमुळे डोंबिवलीतील लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रेल्वे स्टेशनच्या १०० ते १५० मीटर परिसरात फेरीवाल्यांना मनाई आहे. तरी सुद्धा हेफेरीवाले डोंबिवली स्टेशन परिसरात सर्रासपणे रस्त्यांवर, फुटपाथवर धंदा लावतात अतिक्रमण करतात त्यातच त्याठिकाणी रिक्षा देखील मोठ्या प्रमाणात असतात. याचा नाहक त्रास येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना, प्रवाशांना सहन करावा लागतो. स्टेशन परिसरात फेरीवाले, रिक्षाचालक यांची गर्दी होत असल्याने प्रवाशांना चालणे मुश्किल होते. प्रवाशांना रोजच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. काही दिवसांपूर्वी मनसेने देखील याबाबत आवाज उठवला होता परंतु परिस्थिती जैसे थे च आहे.
केडीएमसी महापालिकेचे अधिकारी कारवाई करतात पण त्यांची पाठ फिरल्यानंतर हे फेरीवाले पुन्हा तेथेच ठाण मांडतात. त्यामुळे या फेरीवाल्यांना कोणाचा धाक उरला आहे कि नाही? असा प्रश्न आता निर्माण होत आहे. या फेरीवाल्यांवर कठोर कारवाई का होत नाही असा प्रश्न डोंबिवलीकरांना पडला आहे. डोंबिवली स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त हे केवळ म्हणण्यापुरतेच आहे का? प्रत्यक्षात डोंबिवली स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त झाले हे कधी दिसणार? असे डोंबिवलीकर चर्चा करत आहे.