राज ठाकरेंचे सीमा भागातील मतदारांना आवाहन, म्हणाले…

Published:

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीमाभागातील मराठी मतदारांना आवाहन केले आहे.

राज ठाकरे म्हणाले, कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांसाठी येत्या १० मे ला मतदान आहे. तिथल्या सीमाभागातील माझ्या मराठी मतदार बंधू-भगिनींना माझं आवाहन आहे की मतदान करताना एकजुटीने मराठी उमेदवारालाच मतदान करा. उमेदवार कुठल्या पक्षाचा का असेना तो मराठी असायला हवा, आणि त्याने निवडून आल्यावर मराठी भाषेची सुरु असलेली गळचेपी, मराठी माणसांवर सुरु असलेला वर्षानुवर्षांचा अन्याय ह्याविरोधात तिथल्या विधानभवनात वाचा फोडायलाच हवी.

तुम्ही ज्या राज्याचे आहात, त्या राज्याची भाषा, तिथली संस्कृती ह्याचा आदर केलाच पाहिजे, ह्या ठाम मताचा मी आहे. सीमाभागात कित्येक पिढ्या राहणारे बांधव कन्नड भाषा आणि इथली संस्कृती ह्याचा मान राखत आले आहेत. पण तरीही तिथलं सरकार जर मराठी माणसांना त्रास देणार असेल, मराठी भाषेची गळचेपी करण्याचा प्रयत्न करणार असेल तर ते हे खपवून घेतलं जाणार नाही.

मध्यंतरी जेंव्हा पुन्हा एकदा सीमावदाला कर्नाटक सरकारकडून खतपाणी घालून वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला होता, तेंव्हा मी म्हणलं होतं की कर्नाटक आणि महाराष्ट्रात मुळात एकजिनसीपणा आहे. इथल्या अनेकांची कुलदैवतं कर्नाटकात आहेत तर अनेक कन्नडिगांची कुलदैवतं महाराष्ट्रात आहेत. थोडक्यात दोन राज्यांतील बंध हा मजबूत आहे. तेंव्हा खरंतर कर्नाटक सरकारने सामंजस्याची भूमिका घेतली तर संघर्षाची वेळच येणार नाही. पण कुठल्याही पक्षाचं सरकार तिकडे येऊ दे त्यांच्या वागण्यात यत्किंचितही फरक नसतो. म्हणूनच तिथल्या विधानभवनात मराठी भाषिक आमदार, जो त्या भागातील मराठी अस्मितेचं प्रतिनिधित्व करेल, मराठी माणसांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवेल अशी लोकं असायला हवीत.

ह्यासाठी सीमाभागातील लोकांना १० मे ला संधी आहे. मराठी आमदारच निवडून येतील हे तुम्ही पाहायला हवं, हे तुमच्या आणि पर्यायाने मराठी भाषेच्या हिताचं आहे. ही संधी दवडू नका. असे राज ठाकरे म्हणाले.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page